यवतमाळ:- जिल्ह्यातील खुनाचे सत्र थांबायला तयार नाही. अवघ्या दोन महिन्यांत १४ खून झाले आहेत. प्रियकराने प्रेयसीचा खून केल्याची घटना गुरुवारी घडली. लगेच शुक्रवारी रात्री आर्णीत जावयाने चुलत सासऱ्याला दगडाने ठेचून ठार केले. आर्णी पोलिसांनी आरोपीला अर्ध्या तासात अटक केली.
सय्यद रशीद सय्यद मुसा (४५, रा. मोमीनपुरा) असे मृताचे नाव आहे. सय्यद रशीद हे आर्णीत हमालीचे काम करीत होते. त्यांचा चुलत जावई आरोपी जावेद अली किस्मत अली ऊर्फ छोटू कबुतर ( रा. कुरेशीपुरा, यवतमाळ) याच्यासोबत वाद झाला. शुक्रवारी रात्री सासरे-जावई माहूर चौकातील एका अवैध दारू भट्टीवर दारू पिण्यासाठी गेले होते. तेथे सय्यद रशीद याने जावयाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आरोपी जावेद हा त्याची पत्नी व सासऱ्याला त्रास देत होता. जावेदच्या जाचामुळेच त्याची पत्नी वडिलांच्या घरी राहत होती. समजूत घालत असलेल्या सय्यद रशीद याच्याशी वाद घालत जावेदने त्यांच्यावर दगडाने हल्ला केला. दगडाने डोके फोडल्यावर छाती व पोटावरही दगड घातला.
हा प्रकार रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास घडला. आरोपीने तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आर्णी ठाणेदार पितांबर जाधव पथकासह घटनास्थळी दाखल झाले. आरोपी कोण हे उघड होताच त्याचा शोध घेणे सुरू केले. अर्ध्या तासात आर्णी शहरातील बोरबनमध्ये दडून बसलेल्या जावेदला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर अधीक्षक खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार पितांबर जाधव, सहायक निरीक्षक किशोर खंदार, दिनेश जाधव, अमित झेंडेकर, मिथुन जाधव, मनोज चव्हाण, विजय चव्हाण यांनी केली.
आरोपीवर अनेक गंभीर गुन्हे
आरोपी छोटा कबुतर याच्या विरोधात यवतमाळ शहरासह विविध पोलीस ठाण्यांत अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने यापूर्वीही खून केले आहेत, तर काहींच्या खुनाचा प्रयत्न केला आहे. ही सर्व प्रकरणे न्यायालयात सुरू असून, त्याच्यापासून त्रस्त असल्यानेच पत्नी विभक्त राहत होती. मुलाला भेटण्याच्या बहाण्याने छोटा कबुतर सासुरवाडीला येत होता. यातूनच त्याने चुलत सासऱ्याचा जीव घेतला.