भंडारा : जिल्ह्यात उघडकीस आलेल्या बाळ विक्री प्रकरणात मुख्य आरोपी डॉ. नितेश वाजपेयी याच्याविरोधात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. डिसेंबर महिन्यात मोहदुरा (ता. मोहाडी) येथील एका दाम्पत्याला नवजात बाळ विकल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्या बाळाला ताब्यात घेतले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, या व्यवहारासाठी सुमारे ४ लाख ७० हजार रुपयांचा सौदा करण्यात आला होता. त्यापैकी सुमारे ४ लाख रुपये रोख देण्यात आले, तर उर्वरित ५० हजार रुपये डॉक्टराच्या खात्यावर ऑनलाइन पद्धतीने पाठवण्यात आले होते. या प्रकरणाची चर्चा सुरू होताच अटकेच्या भीतीने बाळ विकत घेणारे दाम्पत्य काही काळ नातेवाईकांकडे मोहगाव देवी येथे जाऊन राहिले होते.
या प्रकरणात वरठी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून आतापर्यंत मुख्य आरोपी डॉ. नितेश वाजपेयी याच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. उपचाराच्या नावाखाली नवजात बालकांची विक्री करणाऱ्या या टोळीने आणखी किती बाळांचा सौदा केला असावा, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. हा तपास पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली साकोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिवम विसापुरे करत आहेत.
तपासादरम्यान आणखी एक गंभीर बाब उघड झाली आहे. मोहदुरा येथील दाम्पत्याला विकण्यात आलेल्या बाळाच्या जन्मदात्या आईचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असून ती अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. कायद्यानुसार अल्पवयीन मुलीची प्रसूती झाल्यास त्याची माहिती पोलिसांना देणे आवश्यक असते. मात्र आरोपी डॉक्टरने ही माहिती जाणीवपूर्वक लपवून ठेवली होती.
तपासात असेही समोर आले की, छत्तीसगड राज्यातील त्या अल्पवयीन मुलीची प्रसूती गोंदिया येथील न्यू बालाजी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली होती. हे रुग्णालय स्वतः डॉ. वाजपेयी यांचे असल्यामुळे हा प्रकार बराच काळ गुप्त राहिला.
या प्रकरणी गोंदिया येथील रामनगर पोलिस ठाण्यात डॉ. वाजपेयीविरुद्ध पोक्सो कायद्याच्या कलम ४, ६, ८ आणि २१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नव्या गुन्ह्यामुळे आरोपीच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून न्यायालयाकडून जामीन मिळणे कठीण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.