ब्रह्मपुरी : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात खर्रा, सुगंधी तंबाखू आणि त्याच्या निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले. या कारवाईत सुमारे ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित दुकानदाराविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने २ जुलै २०२६ रोजी ब्रह्मपुरी येथील धनेश पान सेंटर, टी स्टॉल अँड कोल्डड्रिंक सेंटर येथे अचानक तपासणी केली. तपासादरम्यान दुकानात शासनाने प्रतिबंधित केलेले खर्रा, सुगंधी तंबाखू तसेच त्याच्या निर्मितीसाठी वापरले जाणारे मशीन आणि इतर साहित्य विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले.
त्यानंतर अधिकाऱ्यांनी संपूर्ण साठा जप्त करून संबंधित साहित्य ताब्यात घेतले. या कारवाईत धनेश रंजन राखडे यांच्याकडून प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि उत्पादनासाठी वापरले जाणारे मशीन जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या साहित्याची एकूण किंमत ३१ हजार ५०० रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा करून त्यांची विक्री केल्याप्रकरणी संबंधित दुकानदाराविरुद्ध एफआयआर क्रमांक ५५३/२०२६ नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४ आणि २७५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई संयुक्त आयुक्त (अन्न) के. आर. जयपूरकर आणि सहाय्यक आयुक्त (अन्न) पी. ए. उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी मेघा एन. फाळके यांनी उमेश कापगते, कुणाल मुळे आणि प्रणय कांबळे यांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वीपणे राबविली.
दरम्यान, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध अशाच प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.




कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.