कोरपना : गडचांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा पोलिसांनी काही तासांतच उघडकीस आणत दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. या जलद कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या तपासकार्याची चर्चा होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ मार्च २०२६ रोजी रात्री अरविंद रोहणकर या व्यक्तीवर अज्ञात इसमांनी जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी गडचांदूर पोलिस ठाण्यात बीएनएस (BNS) कलम १०९ अंतर्गत हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर तसेच गडचांदूर पोलिसांनी तपासाची दिशा वेगाने पुढे नेली. तांत्रिक माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान सुरुवातीला आरोपींनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या कसून चौकशीनंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे समोर आले आहे. सध्या दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे तसेच गडचांदूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.




कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.