Akola: बैलजोडी धुण्यासाठी गेलेला मुलगा बंधाऱ्यात बुडाल्याची माहिती मिळताच वडिलांनी घटनास्थळी धाव घेत मुलाला वाचविण्यासाठी बंधाऱ्यातून उडी घेतली. मात्र मुलासोबत बापाचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तेल्हारा तालुक्यातील उकळी बाजार सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.
उकळी बाजार येथे वाण धरणातील कॅनॉलचे पाणी ओव्हरफ्लो होत असल्याने त्या पाण्यावर बंधारा बांधण्यात आला आहे. धरणातून शेतकऱ्यांना सिंचनाकरिता सध्या पाणी सोडले जात आहे. बंधाऱ्यात पाणी असल्याने परिसरातील शेतकरी या ठिकाणी गुरे-ढोरे धुण्यासाठी तसेच जनावरांना पाणी पाजण्यासाठी नेतात. 6 मार्च रोजी उकळी बाजार येथील कन्हैया गजानन शर्मा हा पंधरा वर्षीय मुलगा कपडे काढून बैलजोडी धुण्यासाठी गेला असता बंधाऱ्यात बुडाला ही बाब शेजारी बकऱ्या चारत असणाऱ्या मुक्या असलेल्या मुलाला दिसली. त्याने कन्हैया च्या वडिलांना याबाबत माहिती दिली. कन्हैयाचे वडील गजानन मोहनलाल शर्मा यांनी घटनास्थळ गाठून बंधाऱ्यात उडी घेतली मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. काळाने वडील आणि मुलगा दोघांवर झडप घातली. या दोघांचाही मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच गावकरी मंडळी पोलीस पाटील आणि तलाठी तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास तेल्हारा पोलीस करीत आहेत.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.