गडचांदूर – गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गडचांदूरमधील होली फॅमिली शाळेजवळील रेल्वे बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. परिणामी, परिसरातील नागरिक आणि विशेषतः शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
Read Also: चंद्रपूर: पूरग्रस्त भागाची पाहणीसाठी जिल्हाधिकारी ऑनफिल्ड!
दररोज शाळेत ये-जा करताना विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यातून चालावे लागत असून, त्यामुळे त्यांचा प्रवास अत्यंत अडचणीत झाला आहे. या समस्येमुळे बोगद्याचा मार्ग धोकादायक ठरत आहे.
पालकांमध्ये नाराजी
या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत आहेत. स्थानिक प्रशासनाने याकडे वेळेवर लक्ष न दिल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षी पावसाळ्यात अशाच प्रकारची परिस्थिती उद्भवते, मात्र अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
लखमापूर गावाशी जोडणाऱ्या या मार्गावरून अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या मालवाहतुकीसाठी रेल्वे रस्ता तयार करण्यात आला होता. त्याच भागात हा बोगदा असून, पावसाळ्यात येथे पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठी अडचण सहन करावी लागत आहे.