वडधा : गडचिरोली जिल्हा हा दारूबंदी जिल्हा असला तरी मात्र जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूसह मोह फुलाची दारू सर्रासपणे विकली जात आहे. मात्र, या खुलेआम दारू विक्रीकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. आरमोरी तालुक्याच्या वडधा परिसरात देशी-विदेशी, मोह दारू विक्रीला कोणाचा आशीर्वाद? असा सवाल उपस्थित होत आहे.
पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे अनेक कुटुंबे दारूच्या आहारी जाऊन कित्येक नागरिकांनाविषारी दारू पिऊन जीवसुद्धा गमवावे लागले आहेत. अशी स्थिती आरमोरी तालुक्यातील वडधा परिसरामध्ये सुरू असून वडधा हे गाव ग्रामीण भागामध्ये केंद्रस्थान असल्याने येथे मोठ्या प्रमाणात दारू शौकीन आपली शौक भागविण्यासाठी येत असतात.
वडधात देशी-विदेशी तसेच मोह फुलाची दारू खुलेआम मिळत असल्याने कायदा शांतता व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून दारूमुळे सुजाण नागरिकांना याचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. एवढ्या खुलेआम दारू विक्रीला कोणाचे पाठबळ आहे, असा सवाल आहे. पाठबळ नसेल तर दारू विक्रेत्यांना एवढी मुजोरी येथे कुठून? बरेचसे नागरिक दारूच्या आहारी गेल्याने अतिशौकीन रोडलासुद्धा पडून असतात. वडधा परिसरात वाघाची दहशत असून रोडला पडून असलेल्या व्यक्तीच्या जिवाला धोका आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.