भंडारा : जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील वडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकी पेशाला धक्का देणारी गंभीर घटना उघडकीस आली आहे. चौथी इयत्तेत शिकणाऱ्या पाच विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून एका शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.
माहितीनुसार, १० मार्च रोजी हा प्रकार समोर आला. आरोपी शिक्षक विद्यार्थिनींना मोबाईलवर अयोग्य व्हिडिओ दाखवून त्यांच्याशी अश्लील वर्तन करत असल्याचा आरोप आहे. हा प्रकार विद्यार्थिनींनी घरी सांगितल्यानंतर संतप्त पालकांनी शाळेत धाव घेत शिक्षकाला जाब विचारला. त्यावेळी पालकांनी त्याला चपलेने मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.
पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेऊन पवनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला १३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अनिल जगन राऊत (वय ५४) असे अटकेतील शिक्षकाचे नाव असून तो मागील पाच वर्षांपासून या शाळेत कार्यरत होता. यापूर्वीही त्याच्यावर गंभीर आरोप झाले असल्याची माहिती पुढे आली आहे. २०१८ मध्ये मित्राच्या मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी लाखांदूर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता आणि त्यावेळी त्याला तुरुंगवासही भोगावा लागला होता. तसेच २०१० मध्ये अश्लील वर्तनाच्या प्रकरणात त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते, मात्र नंतर पुन्हा सेवेत घेतल्याचेही समोर आले आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पवनी पोलीस ठाण्याचे ठाणेदार नीलेश ब्राम्हणे करीत आहेत.




कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.