पोलीसांनी आरोपीस जेरबंद करावे, पालकाची पत्रकार परिषदेतून मागणी
गडचिरोली - चामोर्शी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन विद्यार्थीनीस गावातीलच एका युवकाने फूस लावून पळवून नेल्याचा आरोप पालकाने केला आहे. तक्रार करूनही पोलीसांनी अद्याप कारवाई केलेली नसून माझ्या अल्पवयीन मुलीचा पोलीसांनी शोध घेऊन आरोपीस जेरबंद करावे, अशी मागणी मुलीच्या पालकांनी आज १४ फेब्रुवारी रोजी गडचिरोली येथे आयोजीत पत्रकार परिषदेतून केली आहे.
मुलीच्या पालकांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, माझी मुलगी १२ वीचे शिक्षण घेत आहे. गावातीलच एका युवकाने तिला प्रेमाच्या जाळयात ओढून घेतले. सबंधीत युवकाला वारंवार तोंडी सुचना देऊन समजविण्यातआले.
परंतू उलट सबंधीत युवक दारूच्या नशेत आमच्या घरी येऊन शिविगाळ व जिवे मारण्याच्या वारंवार धमक्या देत होता.
मुलीच्या प्रकरणाबाबत पोलीस पाटलांना अवगत करून देण्यात आले. पोलीस पाटलांनी सुध्दा सबंधीत युवकाला समज दिली होती. परंतू त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. याबाबत चामोर्शी पोलीस ठाण्यात २७ जानेवारी रोजी तक्रार दाखल करूनही अद्याप मुलीचा ठावठिकाणा लागला नाही. चामोर्शी पोलीसांनी प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन माझ्या मुलीचा शोध घेउन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीस जेरबंद करावे, अशी मागणी पालकांनी पत्रकार परिषदेतून केली.