पुणे : राज्यात मंगळवारपासून (दि. 21) बारावी बोर्डाची (HSC Exam) परीक्षा सुरु झाली आहे. कोविडनंतर यंदा प्रथमच १०० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होत आहे. राज्यातील 3 हजार 195 केंद्रावर ही परीक्षा आयोजित करण्यात आली असून राज्यात जवळपास साडेचौदा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी (English Paper) विषयात गंभीर चूक (Mistake) समोर आली आहे. इंग्रजी विषयाच्या प्रश्न पत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 03 च्या À3 to A5 या क्रमांकाच्या प्रश्नाऐवजी थेट उत्तर छापण्यात आल्याने बोर्डाच्या कामाची गंभीर चूक समोर आली आहे. तर इतर दोन प्रश्नांमध्ये तपासणाऱ्याला सूचना दिल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना याचे नेमके काय उत्तर लिहावे ? असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे आता बोर्डाने विद्यार्थ्यांच्या बाजूने विचार करत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
- A3 - मध्ये पेपर तपासण्याराला सूचना. (2M)
- A4 - प्रश्नाऐवजी थेट उत्तर (2M)
- A5 - प्रश्नाऐवजी थेट उत्तर (2M)
प्रश्नांसंदर्भात बोर्डाला आपली चूक लक्षात आली असून सर्वच विद्यार्थ्यांना त्या प्रश्नांचे सरसकट सहा गुण देण्याची भूमिका पुणे बोर्डाने घेतली आहे. इंग्रजीचे विषयतज्ज्ञ व सर्व विभागीय मंडळाचे प्रमुख नियामक यांच्यासमवेत संयुक्त सभा घेणार आहे. सभेनंतर विद्यार्थ्यांना सरसकट गुण देण्याचा अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे.
या सर्व प्रकारामुळे यंदा इंग्रजी विषयात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का निश्चितपणे कमी होईल असा विश्वास शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.