गडचिरोली (Gadchiroli Flood 2022 ) : राज्यात सगळीकडे पावसाचा हाहाकार सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट झोन जाहीर केला आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे आलापल्ली-भामरागड मार्ग बंद झाला आहे. पर्लकोटा नदीला आलेल्या जोरदार पावसामुळे मोठा पूर आला आहे. यामुळे हा मार्ग बंद सुद्धा बंद झाला आहे. हा मार्ग बंद झाल्याने जवळपास 130 गावांचा संपर्क हा तुटला आहे. हा पट्टा दुर्गम भागातील असल्याने प्रशासनाची मदत पोहोचायला बराच वेळ लागत असतो.
भामरागड तालुकाच्या मुख्य बाजारपेठेत पाणी शिरल्याने स्थानिक प्रशासनाने तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं होतं. त्यामुळे आतापर्यंत कुठूनही जीवितहानी झाल्याचे वृत्त आलेले नाही, ही बाब दिलासादायक आहे.
सिरोंचामध्ये मुसळधार पावसाने त्या परिररातील 12 गावांचा संपर्क तुटला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने सिरोंचा तालुक्यातील गोदावरी (Godavari ) आणि प्राणहिता (Pranhita ) नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा प्रशासनाने आपतकालीन इशारा दिला असून सिरोंचा (Sironcha ) तालुक्यातील 12 गावे ताबडतोब खाली करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.