नागपूर: विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन; बहुपर्यायी (MCQ) प्रश्‍‍नांचा समावेश | Batmi Express

Nagpur,Nagpur LIve,nagpur news,Nagpur Today,Education,Nagpur University Exam,Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University,

Nagpur,Nagpur LIve,nagpur news,Nagpur Today,Education,Nagpur University Exam,Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University,

नागपूर
:- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर (Nagpur) विद्यापीठाच्या (University) परीक्षा अखेर ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्वत परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. विशेष म्हणजे, ऑफलाइन परीक्षा असताना, विद्यार्थ्यांना त्यांच्याच महाविद्यालयातील होम सेंटरवर परीक्षा द्यावी लागणार आहे. याशिवाय प्रश्‍नपत्रिकेचे स्वरूप बहुपर्यायी राहणार आहे.

विद्यापीठाद्वारे यापूर्वी परीक्षा मंडळाच्या बैठकीत ऑनलाइन परीक्षेबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार विद्यापीठाने तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी कुलगुरूंच्या बैठकीत, ऑफलाइनचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर विद्यापीठाने लवकरात लवकर परीक्षेबाबत निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, याला वीस दिवसांपेक्षा जास्तीचा कालावधी उलटून गेल्यावरही विद्यापीठाकडून कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नव्हता. दोन दिवसांपूर्वी विद्यापीठात कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी बैठक घेतली.
८ जून पासून पदवी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि १५ जूनपासून सर्वच पदव्युत्तर अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाच्या परीक्षा, २२ जून पासून सर्वच अभ्यासक्रमातील सम सत्रांच्या परीक्षा घेण्याचे ठरले. मात्र, परीक्षा नेमकी कोणत्या मोडवर परीक्षा घेण्यात येणार आहे, याबाबत कुठलाच निर्णय घेण्यात आला नव्हता. दरम्यान आज शुक्रवारी सकाळी विद्वत परिषदेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे ठरले. याशिवाय परीक्षेमध्ये बहुपर्यायी प्रश्‍न असलेली प्रश्‍नपत्रिका विद्यापीठाद्वारे देण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्याच महाविद्यालयातील होम सेंटरवर परीक्षा द्यावी लागणार आहे.
तीन सत्रात होणार परीक्षा..

विद्यापीठाद्वारे घेण्यात येणाऱ्या उन्हाळी परीक्षा या एकाच दिवशी तीन सत्रात घेण्यात येणार आहे. यापूर्वी विद्यापीठाद्वारे ऑनलाइन परीक्षा तीन सत्रात घेण्यात येत होती. अंतिम वर्षांसह इतर परीक्षा वेळेत पूर्ण व्हाव्या यासाठी विद्यापीठाने हा निर्णय घेतला असल्याचे समजते.

अशी असेल परीक्षा..
  1. बहुपर्यायी प्रश्‍न (एमसीक्यू)
  2. ५० प्रश्‍न, त्यांपैकी ४० प्रश्‍न सोडविणे
  3. ९० मिनिटाचा वेळ
  4.  महाविद्यालये होम सेंटर
अशा आहेत तारखा..
  1. ८ जून - पदवी अभ्यासक्रम अंतिम वर्ष परीक्षा
  2. १५ जून - पदव्युत्तर अभ्यासक्रम अंतिम वर्ष परीक्षा
  3. २२ जून - सर्व अभ्यासक्रमातील सेम सत्राच्या परीक्षा

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.