चंद्रपूर:- चंद्रपूर येथे एका तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. विहिरीतून मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाला बारा वर्ष झाल्यानंतरही तरुणाच्या घरी पाळणा हलला नव्हता. याबद्दल पत्नी त्यालाच दोष देत होती. एके दिवशी अचानक तरुणाची पत्नी कोणालाही न सांगताच घरातून निघून गेली होती. ती दुसऱ्या पुरुषाशी लग्नही करणार होती. या प्रकारामुळे पती नाराज झाला आणि त्याने आपला जीव दिल्याचा आरोप केला जातो.
काय आहे प्रकरण?
ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील आहे. 40 वर्षीय गोविंदा सदाशिव धानोरकर यांचा 12 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पण त्यांना मूलबाळ नव्हते. नवऱ्यामध्ये कमतरता असल्याचं पत्नी वारंवार बोलून दाखवत असे. पत्नीला मूल हवे होते. 15 दिवसांपूर्वी त्याची पत्नी लग्नासाठी नातेवाईकाच्या घरी जात असल्याचे सांगून घरातून निघून गेली आणि परत आलीच नाही. आज तकच्या वेबसाईटवर यासंदर्भात वृत्त देण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं?
एके दिवशी त्याच्या पत्नीने फोनवर माहिती दिली की ती दुसरं लग्न करणार आहे. हे ऐकून गोविंद बिथरला आणि समाजात नाचक्की होण्याची भीती त्याला सतावू लागली. त्यानंतर गोविंदा दुपारी सायकल घेऊन घराबाहेर पडला. गावाबाहेरील विहिरीवर पोहोचला. सायकल तिथेच फेकून दिली आणि धावत जाऊन त्याने विहिरीत उडी मारली. आजूबाजूला उपस्थित ग्रामस्थ त्याला पकडण्यासाठी धावले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
नाचक्कीच्या भीतीने टोकाचं पाऊल
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला. मृताची पत्नी त्याला सोडून दुसरं लग्न करणार होती. त्यामुळे तो अस्वस्थ झाला आणि त्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली, असं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी चिमूर पोलीस ठाण्याचे एसएचओ मनोज गभणे तपास करत आहेत.