आरमोरी: एकेकाळी नक्षलवाद्यांची दहशत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आता वाघ आणि रानटी हत्तीची दहशत वाढत आहे. असाच एक प्रसंग सोमवारी दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास आरमोरी – रामाळा मार्गावर प्रवाशांना अनुभवायला मिळाला. या मार्गावर चक्क एका वाघाने ठिय्या मांडल्याने प्रवशांची तारांबळ उडाली. काही वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील उत्तर भागात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या परिसरात मानव वन्यजीव संघर्षदेखील वाढला आहे. हा वाघ रस्ता ओलांडत असतानाची चित्रफित समाजमाध्यमात प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे.
रामाळा-आरमोरी मार्गावर सोमवारी दुपारी एका वाघाने बराच वेळ ठिय्या मांडल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. हा प्रसंग काही प्रवाशांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपला. यात तो वाघ रस्त्यावरून मुक्तपणे वावरताना दिसून येत आहे. याच परिसरात काही दिवसांपूर्वी वघाची जोडीला अनेकांनी पाहिले होते. हा त्यातीलच एक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान, ही चित्रफित सध्या समाजमाध्यमावर प्रसारित होत आहे. यासंदर्भात वनविभागाने अद्याप कुठलाही खुलासा केला नाही. मात्र, परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने वनविभागाने तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.
यापूर्वी दोन बळी
दरम्यान, महिनाभरापूर्वी देसाईगंज वनक्षेत्रात गवत कापताना महिलेला टी- ९ वाघिणीने हल्ला करून बळी घेतला होता. त्यानंतर याच जंगल क्षेत्रात वनविभागाच्या वाहनचालकास एका रानटी हत्तीने सोंडेने उचलून जमिनीवर आपटून ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली होती.