कुरखेडा : तालूक्यातील रामगड येथील शासकीय निवासी आदिवासी आश्रमशाळेत राहुन शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मूलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना निदर्शनास आल्याने खळबळ निर्माण झाली. दरम्यान आरोपी विरोधात पूराडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामगड येथील निवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या मूलीची तब्येत अस्वस्थ असल्याने तिची शासकीय रूग्णालय येथे तपासणी करण्यात आली. यावेळी तिच्यावर अत्याचार झाला असल्याचे निदान झाल्याने खळबळ माजली होती. सदर घटनेची माहीती होताच माजी जि. प. सदस्य प्रभाकर तुलावी, आश्रमशाळा
व्यवस्थापन समीती अध्यक्ष प्रल्हाद नैताम, पोलिस पाटील बोरकर, पोलिस पाटील गावळे, सामाजिक कार्यकर्ते नाजूक दखने, रतिराम टेकाम, सुधाकर गावळे यांनी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक तूमसरे यांच्या दालनात भेट घेत त्यांना झालेल्या प्रकरणाबाबत जाब विचारला व कार्यवाहीची मागणी केली तसेच भविष्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जिवनाबाबत खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली.
याबाबत पूराडा पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकारी भूषण पवार यांच्याकडून माहिती घेतली. यावेळी त्यानी घटनेला दूजोरा दिला व आरोपी विरोधात भादंवि ३७६ व पोक्सो अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे सांगितले. आरोपीची अटक कार्यवाही व्हायची आहे व तपास सूरू आहे त्यामूळे अधिक माहीती देण्यास त्यांनी नकार दिला.
Updated:
एका शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील वसतिगृहात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण ९ ऑक्टोबरला उजेडात आले होते. या घटनेने एकच खळबळ उडाली होती.
दरम्यान, याप्रकरणी पुराडा पोलिस ठाण्यात बलात्कार व बाललैंगिक अत्याचार कलमान्वये गुन्हा नोंद झाल्यानंतर सहायक निरीक्षक भूषण पवार यांनी वेगाने तपासचक्रे फिरवली व रात्री अजय रामटेके (२१) यास अटक केली. त्यास १० ऑक्टोबरला कुरखेडा न्यायालयात हजर केले.
न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती पुराडा ठाण्याचे प्रभारी अधिकारी भूषण पवार यांनी दिली.
दरम्यान, या घटनेनंतर महिला चौकशी समिती गठीत करून अहवाल मागविला. त्यात वातकर यांचा खुलासा असमाधानकारक आढळला. मुलींच्या आरोग्याबाबत तसेच सुरक्षेबाबत हलगर्जी केल्याचा ठपका ठेवून अधीक्षिका वातकर यांना निलंबित केले असून शिक्षिका व्ही. व्ही. केंद्रे यांच्याकडे तात्पुरता पदभार दिला.
पुनर्वसन करावे
दरम्यान, पीडित मुलीला तात्काळ आर्थिक मदत करून पुनर्वसन करावे, अशी मागणी आदिवासी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष छगन शेडमाके यांनी केली आहे. शासकीय वसतिगृहात शिकणाऱ्या मुलीबाबत हा घृणास्पद प्रकार घडल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे ते म्हणाले. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला कठोर शासन करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.