चंद्रपूर : विदर्भात सध्या चांगलाच पाऊस पडत असून गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी लोक पुराच्या पाण्यात अडकल्याचीही घटना घडत आहे. चंद्रपुरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसमधील 35 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. चिंचोली नाका परिसरात ही बस अडकली होती.
स्थानिकांनी दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणे बस चालकाला चांगलेच महागात पडले आहे. चंद्रपूर येथील चिंचोली नाला येथे पुराच्या पाण्यात बस अडकली होती. या बसमध्ये 35 प्रवासी होते. पुराच्या पाण्यात बस अडकल्याची माहिती विरुर पोलीस ठाण्याला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी धाडसी कामगिरी करत प्रवाशांची सुटका केली. ही बस राजुरा तालुक्यातील चिंचोली मार्गे हैदराबादला जात होती. या खासगी ट्रॅव्हल्सच्या बस चालकाला स्थानिक पोलीस पथकाने पुढे जाण्यास मज्जाव केला होता तरीदेखील बस चालकाने त्याकडे दुर्लक्ष करत बस पुढे नेली. त्यानंतर पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास ही बस पुराच्या पाण्यात बंद पडली. भर पुराच्या पाण्यात बस बंद पडल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होती. पुराच्या पाण्यात बसचा अर्धा भाग बुडाला होता.
याबाबत माहिती मिळताच, विरुर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचाव कार्य सुरू केले. विरूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वात पहाटेच्या अंधारात बचाव कार्य सुरू केले. पोलिसांच्या मदतीला स्थानिकही धावून आले होते. स्थानिकांच्या मदतीने पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू असतानादेखील बचाव कार्य सुरू करण्यात आले. दोऱ्या बांधून बसमधील पुरुष, वृद्ध, लहान मुले व महिला यांची सुखरुपपणे सुटका केली. या प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून त्यांना हैदराबादच्या दिशेने रवाना करण्यात आले. चंद्रपूर पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे सध्या कौतुक होत आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.