राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. यामुळे प्रशासन हायअलर्टवर आहे. या पार्श्वभूमीवर आज दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची (DDMA) महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत उपराज्यपालाच्या अध्यक्षतेखाली कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात येईल. तसेच या बैठकीत पुन्हा मास्क सक्ती लागू करण्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची अपेक्षा आहे. दिल्लीत वाढत्या कोरोना रुग्णांमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला डीडीएमएने मास्क सक्ती आणि 500 रुपयांचा दंडाचा निर्णय मागे घेतल्यानंतर दिल्लीतील जनतेकडून मास्कच्या वापरात लक्षणीय घट झाली आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संसर्गाची वाढती संख्या पाहता ही परिस्थिती चांगली नाही. बैठकीदरम्यान, दिल्लीत मास्कच्या अनिवार्य वापराच्या कठोर अंमलबजावणीसाठी पुन्हा दंड आकारण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळांमध्येही मुलांना कोरोनाचा संसर्गाचा फटका बसल्यामुळे डीडीएमएच्या बैठकीत ऑफलाइन आणि ऑनलाइन शिक्षण्याच्या पर्यायावरही चर्चा होऊ शकते. विशेष म्हणजे दिल्लीत कोरोनाबाधित मुलांची संख्येत वाढ होत असल्याने पालकांची चिंताही वाढली आहे. दिल्ली सरकारने शाळेत कोणताही विद्यार्थी किंवा शिक्षक कोरोनाबाधित आढळल्यास विशिष्ट वर्ग किंवा शाळा बंद करण्याचे आदेश शालेय प्रशासनाला दिले आहेत.