चंद्रपूर:- हायवा ट्रकच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी (1 फेब्रुवारी 2022) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. दुचाकी चालक विठ्ठल गुंजेकर (वय 54), पुरुषोत्तम निर (वय 45) रा. भोयगाव हे जागीच ठार झाले.
कोरपना तालुक्यातील कवठाळा येथे गडचांदूर घुगुस जिल्हा महामार्गावर आज मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता चे सुमारास भरधाव हायवा ट्रकने कवठाळा स्टेट बँकेच्या अगदी समोर गडचांदूर वरून भोयगाव ला परत जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीचालक विठ्ठल गुंजेकर व सहकारी पुरुषोत्तम निर हे जागीच ठार झाले.
हे देखील वाचा:
|चंद्रपूरचे नगरसेवक दीपक जयस्वाल यांच्या कारचा अपघात
सदर घटनेची माहिती होताच कवठाळा गावचे सरपंच नरेश सातपुते हे आपल्या सहकार्यासोबत घटनास्थळी पोहोचले. ट्रक चालक फरार झाल्याचे कळताच सरपंच नरेश सातपूते यांनी, क्षणाचाही विलंब न करता स्वतःच्या दुचाकीने आपल्या साथीदारांसह वनसडी येथे तीस किलोमीटर अंतरावर नांरडा फाट्याजवळ ट्रकला पकडले. सदर घटनेची माहिती गडचांदूर पोलिसांना दिल्यानंतर ठाणेदार सत्यजित आमले, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद शिंदे, अंमलदार चरणदास मडावी यांनी, ट्रक ताब्यात घेत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मागील दोन वर्षापासून गाव ते गडचांदूर या जिल्हा महामार्गाचे काम अगदी संथ गतीने सुरु असल्यामुळे या मार्गावर अनेक अपघात घडले आहेत. त्यामुळे अनेकांना कायमचे अपंगत्व आले, तर अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप सरपंच नरेश मदन सातपुते यांनी केला आहे.