भंडारा जिल्ह्यात मंगळवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. विशेषतः या पावसाचा फटका मोहाडी, तुमसर तालुक्याला मोठ्या प्रमाणात बसला. वादळ, वारा आणि काही प्रमाणात गारपीट देखील मोहाडी तुमसर भागात झाली.
(ads1)
प्रचंड विजांचा कडकडाट देखील झाला आणि यामध्ये नवेगांव (धुसाळा) येथील नयन परमेश्वर पुंडे या 9 वर्षीय लहान बालकाचा मृत्यू झालेला आहे. नयन हा आजोबासोबत म्हशी चारण्यासाठी गेलेला होता, यात वीज पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेतात असलेल्या एका बैलाचा देखील वीज पडल्यामुळे मृत्यू झाला.
याशिवाय अवकाळी पावसामुळे अनेकांच्या घराचे कवेलू फुटले तर शेतात लाखोरी आणि धान पिकासह अन्य पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी देखील चिंताग्रस्त आहे. हवामान खात्याने मोहाडी तालुक्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली होती मात्र एवढ्या भयानक स्वरूपात पाऊस येईल असे कुणालाही वाटले नव्हते.
अवकाळी झालेल्या पावसामुळे दोन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. काही ठिकाणी गारांचा पडलेला खच पाहून जणु काश्मीरचे स्वरूप त्या भागाला आले होते.