सिंदेवाही : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात आज अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली. गुंजेवाही जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या चार महिलांवर वाघाने हल्ला करून त्यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्यजीव आणि मानव संघर्षातील ही अत्यंत गंभीर घटना मानली जात असून, एकाच वेळी चार महिलांचा बळी गेल्याने परिसर हादरून गेला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, गुंजेवाही गावातील काही महिला नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. जंगलातील वेगवेगळ्या भागात काम सुरू असताना अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने महिलांवर हल्ला चढवला. महिलांना काही समजण्याच्या आतच वाघाने एकामागोमाग एक अशा चार महिलांवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
Read Also: चंद्रपूरमध्ये पुन्हा वाघाचा हल्ला; तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला गंभीर जखमी
या भीषण घटनेत कवडुबाई दादाजी मोहुर्ले (४५), अनुबाई दादाजी मोहुर्ले (४६), संगिता संतोष चौधरी (३६) आणि सुनिता कौशिक मोहुर्ले (३३) यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर जंगल परिसरात भीतीचे सावट पसरले असून ग्रामस्थांमध्ये संताप आणि घबराट निर्माण झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, पोलिसांचे पथक आणि बचाव कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून परिसरात शोधमोहीमही राबविण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे जंगलालगतच्या गावांतील नागरिकांमध्ये तीव्र भीती निर्माण झाली आहे. तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात जाणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ग्रामस्थांनी वनविभागाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात यापूर्वी वाघांच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या असल्या, तरी एकाच घटनेत चार महिलांचा मृत्यू झाल्याची ही अत्यंत गंभीर घटना मानली जात आहे. वनविभागाकडून पुढील तपास सुरू असून संबंधित वाघाचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.



कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.