चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता चंद्रपूर तालुक्यात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वरवट परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला केल्याने संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग घडणाऱ्या घटनांमुळे जंगलालगतच्या गावांमध्ये नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरवट येथील रहिवासी योगिता चंद्रपाल जेंगठे या आज सकाळी इतर महिलांसोबत ताडोबा बफर झोन परिसरातील जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. जंगलात काम सुरू असताना अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर झडप घालत हल्ला केला.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. योगिता यांच्या सोबत असलेल्या महिलांनी प्रसंगावधान राखत जोरदार आरडाओरडा सुरू केला. महिलांचा आवाज आणि गोंधळ ऐकून वाघ काही वेळातच जंगलाच्या दिशेने पळून गेला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि योगिता यांचे प्राण वाचले.
मात्र या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या शरीरावर खोल जखमा झाल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांकडून प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
दरम्यान, काही तासांपूर्वीच सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला होता. त्या सर्व महिला देखील तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेल्या होत्या. त्यानंतर लगेचच वरवट परिसरात घडलेल्या या घटनेमुळे वनविभागाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Read Also: सिंदेवाही हादरले! तेंदूपत्ता तोडायला गेलेल्या चार महिलांना वाघाने केले ठार
तेंदूपत्ता हंगाम सुरू असल्याने मोठ्या संख्येने महिला आणि मजूर जंगलात जात आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने अतिरिक्त उपाययोजना कराव्यात, जंगल परिसरात गस्त वाढवावी आणि धोकादायक भागात प्रवेशबंदी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
या घटनांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलालगतच्या गावांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरणही पाहायला मिळत आहे.



कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.