चंद्रपूर : उदरनिर्वाहासाठी शेजारच्या तेलंगणा राज्यात हंगामी शेतमजुरी करण्यासाठी गेलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील कामगारांवर दुर्दैवाने काळाने घाला घातला. तेलंगणातील रामगुंडम परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात चार मजुरांचा मृत्यू झाला असून २७ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे सिंदेवाही तालुक्यासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंदेवाही तालुक्यातील पवना चक गावातील अनेक महिला व पुरुष दरवर्षीप्रमाणे यंदाही भात लागवडीच्या हंगामासाठी तेलंगणात गेले होते. दिवसभर शेतात रोवणीचे काम पूर्ण करून सर्व मजूर सायंकाळी आपल्या निवासस्थानी परतत असताना त्यांचे वाहन रामगुंडम परिसरात अपघातग्रस्त झाले.
या अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की वाहनातील अनेक मजूर गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिक आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या दुर्घटनेत अतुल वासुदेव सोनुले (वय ४५), अर्चना जनार्धन सोनुले (वय ४०), प्रभा सिताराम मोहुर्ले (वय ५६) आणि रंजना प्रभाकर शेंडे (वय ५०) यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातात जखमी झालेल्या २७ मजुरांवर तेलंगणातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून असून जखमींना आवश्यक वैद्यकीय मदत पुरवली जात आहे.
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह हंगामी शेतीमजुरीवर अवलंबून आहे. पावसाळ्याच्या काळात हजारो मजूर भात लागवडीच्या कामासाठी तेलंगणात स्थलांतर करतात. मात्र, या वर्षी काम आटोपून परतताना घडलेल्या या अपघाताने अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
घटनेची माहिती गावात पोहोचताच मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. गावात शोककळा पसरली असून जखमी मजुरांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून मृतांच्या कुटुंबियांना मदत आणि जखमींना योग्य उपचार मिळावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.




कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.