गडचिरोली: शहरापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या काटली गावाजवळ आज पहाटे एक भीषण अपघात घडला. पहाटेच्या वेळेस फिरायला गेलेल्या सहा मुलांना अज्ञात भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, उर्वरित दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृतांमध्ये टिंकू नामदेव भोयर (१४), तन्मय बालाजी मानकर (१६), दुषण दुर्योधन मेश्राम (१४) आणि तुषार राजेंद्र मारभते (१४) या काटली येथील चार मुलांचा समावेश आहे. अपघात घडल्यानंतर ट्रक चालक अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला.
माहितीनुसार, सहाही मुले रोजप्रमाणे पहाटे व्यायामासाठी बाहेर पडली होती. गडचिरोली-आरमोरी मुख्य रस्त्यालगत काटली गावाजवळील नाल्याजवळ ही घटना घडली. सकाळी साडेपाचच्या सुमारास एक भरधाव ट्रक त्या ठिकाणी धावत आला आणि रस्त्याच्या कडेला बसलेल्या मुलांना चिरडून गेला. टिंकू आणि तन्मय या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर चार जणांपैकी दोन जणांना वाचवण्यात यश आले.
या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, ट्रक आणि चालकाचा शोध सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी अपघातस्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.