रुग्णवाहिकेअभावी जखमी इसमाची खाटेवरून तीन किलोमीटर पायपीट
गडचिरोली – राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीची जबाबदारी स्वीकारली असली, तरी जिल्ह्याच्या दुर्गम भागातील नागरिकांना अद्यापही आरोग्य सुविधा अपुऱ्या असल्याचे वास्तव समोर आले आहे.
एटापल्ली तालुक्यातील पेंदुलवाही या गावातील मनिराम रामा हिचामी (वय ३५) हा शेतात ट्रॅक्टर चालवताना ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला. अपघातानंतर गावकऱ्यांनी तात्काळ जारावंडी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून रुग्णवाहिकेची मागणी केली. मात्र, त्या वेळी रुग्णवाहिका दुसऱ्या रुग्णाला गडचिरोलीला घेऊन गेल्यामुळे ती उपलब्ध झाली नाही.
परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेता मनिरामच्या कुटुंबीयांनी आणि सहकाऱ्यांनी खाटेचा वापर करून तात्पुरती कावड तयार केली व त्याला खांद्यावर घेत तीन किलोमीटरपर्यंत जंगलातून कसूरवाही गावापर्यंत पायी नेले. त्यानंतर जारावंडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी खासगी वाहन पाठवून त्याला उपचारासाठी केंद्रात आणले.
प्राथमिक उपचार केल्यानंतर मनिरामला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
ही घटना केवळ अपुऱ्या आरोग्य यंत्रणेवरच नव्हे, तर दुर्गम भागातील रस्त्यांचा अभाव, पावसाळ्यातील अडथळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. अद्यापही अनेक गावांना योग्य रस्ते, पूल किंवा वैद्यकीय आपत्कालीन सेवा उपलब्ध नसल्याने अशा दुर्दैवी प्रसंगांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.