सावली (जि. चंद्रपूर): "मी आत्महत्या करणार आहे," असे पूर्वीच सांगून ठेवलेल्या एका ३२ वर्षीय युवकाने अखेर गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. ही दुर्दैवी घटना मंगळवारी, २९ जुलै रोजी गेवरा बुज या गावात घडली. मृताचे नाव प्रशांत विठ्ठल चौधरी असे आहे.
प्रशांतने काही दिवसांपूर्वी नातेवाईकांना आत्महत्येची इशारा दिला होता. मात्र, त्याला दारूचे व्यसन असल्यामुळे कुटुंबीयांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. सोमवारी, २८ जुलै रोजी कुटुंबीयांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्या दिवशी, म्हणजेच मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास, घरच्यांची नजर चुकवून त्याने बकरी पालन शेडमध्ये गळफास लावून आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितेश डोर्लीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला व नंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आत्महत्येचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.