नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गंभीर प्रकार समोर आला आहे. भाडेकरू म्हणून राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणाने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवत तिचा गैरफायदा घेतल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. सिम्बा ठाकरे (वय २३) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
पीडित मुलगी दहावीत शिक्षण घेत असून तिची प्रकृती बिघडू लागल्याने कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले. तपासणीनंतर ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाल्याने कुटुंबीयांना धक्का बसला. त्यानंतर आईने विचारपूस केली असता मुलीने घडलेली घटना सांगितली.
माहितीनुसार, आरोपी सिम्बा ठाकरे हा एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत काम करत असून तो मुलीच्या घरी भाडेकरू म्हणून राहत होता. ओळखीचा फायदा घेत त्याने मुलीशी जवळीक वाढवली. ५ जानेवारी २०२६ रोजी मुलगी घरात एकटी असताना त्याने तिच्यावर जबरदस्ती केली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत एप्रिल अखेरपर्यंत वारंवार अत्याचार केल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकारामुळे मुलगी गर्भवती राहिल्याने प्रकरण उघड झाले. तक्रारीच्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.


कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.