गडचिरोली : खून प्रकरणाचा तपास वेगाने करत पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. आरोपीला शस्त्र उपलब्ध करून देणे तसेच गुन्ह्यानंतर पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदामा रामभाऊ चौधरी (वय ३३, रा. शिरसगाव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) याने जुन्या वादातून श्यामकला हिच्यावर हल्ला केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
श्यामकला मागील काही महिन्यांपासून मेंढा परिसरातील एका घरात राहत होती. ८ मे रोजी रात्री जेवणानंतर दोघांमध्ये वाद झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर आरोपीने धारदार शस्त्राने तिच्यावर हल्ला केला आणि घटनास्थळावरून फरार झाला.
घटनेनंतर पोलिसांनी विविध पथके तयार करून तपास सुरू केला. अखेर १० मे रोजी आरोपीला चंद्रपूर येथून ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान आरोपीला मदत करणाऱ्या आणखी दोन जणांची नावे समोर आली. चेतन धर्माराव खोब्रागडे (वय २१, रा. इंदिरानगर) याने आरोपीला हल्ल्यासाठी शस्त्र उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे. तसेच एका विधीसंघर्षित बालकाने आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याचेही निष्पन्न झाले.
या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.



कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.