नागपूर : कुही तालुक्यातील चन्ना-वेलतूर जंगल मार्गावर एका दाम्पत्यासमोर अचानक वाघ आल्याने काही काळ थरारक परिस्थिती निर्माण झाली. सुदैवाने प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि वाघ कोणतीही इजा न करता जंगलाच्या दिशेने निघून गेला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.
माहितीनुसार, शिक्षक नितीन खोब्रागडे हे पत्नीसमवेत दुचाकीने एका विवाह समारंभासाठी वेलतूरकडे जात होते. सायंकाळच्या सुमारास चन्ना-वेलतूर मार्गावरील जंगल परिसरातून जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला एक पट्टेदार वाघ बसलेला दिसला. अचानक समोर वाघ दिसताच दोघेही घाबरले.
वाघ पाहताच नितीन यांनी दुचाकी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, घाईगडबडीत दुचाकीचा तोल गेला आणि त्यांच्या पत्नी रस्त्यावर पडल्या. आवाज होताच वाघ त्यांच्या दिशेने चालत आल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली. काही क्षणांत वाघ अगदी जवळ येऊन थांबला. त्या वेळी दोघांनीही शांतता राखत कोणतीही हालचाल किंवा आरडाओरड केली नाही.
काही वेळ वाघ त्यांच्याकडे पाहत उभा राहिला. वातावरणात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. मात्र, काही क्षणांनी वाघाने दिशा बदलली आणि शांतपणे जंगलात निघून गेला. वाघ दूर गेल्यानंतर दाम्पत्याने सुटकेचा निःश्वास सोडला.
दरम्यान, रस्त्यावर पडल्याने महिला जखमी झाल्या होत्या. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना वेलतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.



कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.