नागपूर : कोराडी परिसरात उभारण्यात येत असलेली भगवान हनुमानांची भव्य मूर्ती आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, मध्य भारतातील सर्वात उंच हनुमान मूर्ती म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. महालक्ष्मी जगदंबा मंदिराजवळ साकारत असलेल्या या आकर्षक प्रकल्पामुळे भाविकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाचे काम जून महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मूर्तीचे भव्य लोकार्पण करण्यात येणार आहे.
या संपूर्ण संरचनेची उंची सुमारे २०६ फूट असून त्यापैकी मूर्तीची उंची १६२ फूट आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मूर्तीची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भगवान हनुमानांच्या हातातील सुमारे ७४ फूट उंचीची विशाल गदा हे या प्रकल्पाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.
ही गदा जगातील सर्वात मोठ्या गदांपैकी एक मानली जाणार असून तिची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
मूर्तीला विशेष धातूचा लेप देण्यात आला असून त्यामुळे तिची चमक आणि टिकाऊपणा वाढला आहे. रात्रीच्या वेळी आकर्षक लाईटिंग आणि प्रोजेक्शन मॅपिंगच्या सहाय्याने मूर्ती विविध स्वरूपात पाहता येणार आहे. तसेच प्रोजेक्शनद्वारे हनुमान चालीसाचे सादरीकरण करण्याचीही व्यवस्था करण्यात येत आहे.
धार्मिक श्रद्धा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम असलेला हा प्रकल्प नागपूरसाठी मोठे आकर्षण ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.