मुंबई/गडचिरोली : महाराष्ट्राच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी द्रुतगती महामार्ग प्रकल्पांना राज्य सरकारने मोठी मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत विदर्भातील ५४७ किलोमीटर लांबीच्या चार प्रवेश नियंत्रित द्रुतगती मार्गांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
या प्रकल्पांमध्ये गडचिरोली जिल्ह्यासाठी महत्त्वाचे मानले जाणारे भंडारा-गडचिरोली द्रुतगती मार्ग तसेच नवेगाव मोरे-कोनसरी ते सुरजागड ग्रीन फिल्ड रस्ता यांचा समावेश आहे. औद्योगिक आणि खनिज वाहतुकीला गती देण्यासाठी हे प्रकल्प महत्त्वाचे ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज,गुरुवार १४ मे रोजी मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार,सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले,उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,राज्यमंत्री इंद्रनील नाईक,राज्यमंत्री आशिष जयस्वाल,मुख्य सचिव राजेश अग्रवाल,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर,महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, सचिव(बांधकामे) आबासाहेब नागरगोजे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.अप्पर मुख्य सचिव म्हैसकर यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे प्रकल्पांची माहिती दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देत नवेगाव मोरे ते सुरजागड मार्ग समृद्धी महामार्गाशी जोडण्याबाबतही निर्देश दिले. हा मार्ग खनिज वाहतुकीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
बैठकीत मंजूर करण्यात आलेले प्रकल्प पुढीलप्रमाणे आहेत :
नागपूर-गोंदिया प्रवेश नियंत्रित द्रुतगती मार्ग
भंडारा-गडचिरोली द्रुतगती मार्ग
नागपूर-चंद्रपूर द्रुतगती मार्ग
नवेगाव मोरे-कोनसरी ते सुरजागड ग्रीन फिल्ड रस्ता
या चारही प्रकल्पांची एकत्रित बांधकाम किंमत सुमारे ५१ हजार ९०६ कोटी रुपये असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत कामे केली जाणार आहेत. प्रकल्प सप्टेंबर ते डिसेंबर २०२८ दरम्यान पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
प्रकल्पांची ठळक वैशिष्ट्ये :
नागपूर-गोंदिया द्रुतगती मार्ग
लांबी : १६२.३७७ कि.मी.
मार्ग : गवसी मानपूर (नागपूर) ते सावरी (गोंदिया)
३+३ लेन, ९ इंटरचेंज
भंडारा-गडचिरोली द्रुतगती मार्ग
लांबी : ९४.२४१ कि.मी.
मार्ग : बोरगाव (भंडारा) ते ऋणमोचन (चंद्रपूर)
३+३ लेन, ६ इंटरचेंज
नागपूर-चंद्रपूर द्रुतगती मार्ग
लांबी : २०४.७९९ कि.मी.
मार्ग : सेलडोह (वर्धा) ते नवेगाव मोरे (चंद्रपूर)
२+२ लेन, ७ इंटरचेंज
नवेगाव मोरे-कोनसरी ते सुरजागड ग्रीन फिल्ड रस्ता
लांबी : ८५.७६५ कि.मी.
मार्ग : नवेगाव मोरे ते मंगेर (गडचिरोली)
२+२ लेन
या प्रकल्पांमुळे विदर्भातील वाहतूक, उद्योग आणि खनिज क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.