दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील दरगोडे कुटुंबातील सदस्य आणि काही विद्यार्थी दिंडोरी शहरात खासगी शिकवणीच्या कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री सुमारे १० वाजता सर्वजण (MH15-JS-1053) या क्रमांकाच्या कारने परत गावाकडे निघाले होते. मात्र, शिवाजी नगर परिसरात राजू राजे यांच्या मालकीच्या पाण्याने भरलेल्या उघड्या विहिरीत कार कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. विहिरीत पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने आणि अंधारामुळे बचावकार्य अडथळ्यांत पार पडत होते. सुमारे मध्यरात्री १२ वाजता तीन हायड्रा क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान, घटनास्थळी जमलेल्या गर्दीमुळे बचावकार्य काही काळ विस्कळीत झाले होते.
कार बाहेर काढल्यानंतर त्यामधील ९ जणांचा बुडून व श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या अपघातात इंदोरे गावातील दरगोडे कुटुंबातील अनेक सदस्यांचा समावेश असल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये सुनील दत्तात्रय दरगोडे (३२), रेशमा सुनील दरगोडे (२७), आशा अनिल दरगोडे (३२), गुणवती सुनील दरगोडे (११), श्रेयश अनिल दरगोडे (११), श्रावणी अनिल दरगोडे (११), सृष्टी अनिल दरगोडे (१४), समृद्धी राजेंद्र दरगोडे (७) आणि श्रद्धा अनिल दरगोडे (१३) यांचा समावेश आहे.
आनंदाने कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या कुटुंबावर आणि लहान मुलांवर आलेल्या या दुर्दैवी प्रसंगामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.



कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.