भंडारा:- तुमसर तालुक्यातील बावणथडी नदीवर असणाऱ्या सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाच्या धरणात मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. राजेश मोरेश्वर आंबेडारे (28) असे या तरूणाचे नाव असून तो वारपिंडकेपार (ता. तुमसर) या गावचा आहे.
सक्करधरा गावाच्या शिवारातील खाजगी वीट भट्टीवर मजूर म्हणून राजेश कामावर होता. मंगळवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास गावाशेजारी असलेल्या बावणथडी नदीवरील सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाच्या धरणात मासे पकडण्यासाठी गेला होता. परंतु धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला. प्रकल्पाच्या धरणात पाणी अडविण्यात आल्याने नदीच्या पात्रात जाण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे. प्रकल्प स्थळातून पाण्याचा उपसा सुरू झाला आहे. धरण मार्ग मध्यप्रदेशातील गावांना जोडण्यात आल्याने वाहतुकीची वर्दळ असते. दुपारनंतर धरणातील पाण्यात राजेशचा मृतदेह तरंगताना नागरिकांना दिसून आला आहे. त्यांनी प्रकल्प स्थळावरील सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना माहिती कळविली. चौकशीनंतर तयाची ओळख पटली.
राजेशच्या कुटुंबात पत्नी आणि दीड वर्षीय मुलगा आहे. वीट भट्टीवर मजुरी करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह राजेश करीत होता. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मनमिळाऊ स्वभाव असलेल्या राजेशच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.
प्रकल्पातील डोह धोकदायक
प्रकल्पाच्या उर्ध्व भागात अनेक डोह आहेत. या डोहात मासोळ्या पकडण्याचे काम अनेक तरुण करतात, त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. धरण आणि डोह धोकादायक असताना कुणी जुमानत नाहीत. मासोळ्या पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचे हकनाक जीव गेले आहेत. यापूर्वी अशा अनेक घटना धरणात घडलेल्या आहेत. प्रकल्पाचे उर्ध्व भागात आणि धरणाच्या पाण्यात मासेमारी प्रतिबंधित असून तसे फलकही लावण्यात आले आहेत. तरीही त्याकडे दुर्लक्ष करून मासेमारी सुरूच आहे. पाटबंधारे विभागाने कठोर निर्णय घेण्याची मागणी होत आहे.