चंद्रपूर: चंद्रपूरच्याच नव्हे तर राज्याच्या टोकावर असलेला जिवती तालुका.... त्यातच दुर्गम भाग आणि महाराष्ट्र – तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेले महाराजगुडा गाव....गावातील एकूण मतदार 281.....आणि यात एक दिव्यांग मतदार. होय, या एका दिव्यांग व्यक्तिच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा गावात पोहचते आणि गृह मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीसाठी अमूल्य असलेले मत नोंदविते. हीच लोकशाहीची खरी ताकद.
सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. याच अनुषंगाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात 8 ते 14 एप्रिल या कालावधीत गृह मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. याचा शुभारंभ सोमवारी (दि.8) अतिदुर्गम असलेल्या जीवती तालुक्यात झाला.
महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या महाराजगुडा येथील सुरेखा तुकाराम राठोड (वय 40) या एकमेव दिव्यांग असलेल्या महिलेने गृह मतदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार प्रशासनाने त्यांच्याकडून नमुना 12 – डी भरून घेतला होता. सुरेखा यांचे गृह मतदान घेण्यासाठी सोमवारी (दि. 8) जीवती तालुक्यातील टीम क्रमांक 10, महाराजगुडा येथे सुरेखा यांच्या घरी पोहचली. गृह मतदानाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितल्यानंतर सुरेखा यांनी आपले अमुल्य मत नोंदविले. सुरेखा ह्या पूर्णपणे दिव्यांग असून त्या एका क्षणासाठीसुध्दा उभ्या राहू शकत नाही. त्यामुळे त्यांनी आपले मत घरातच स्थापन केलेल्या मतदान कक्षात बसूनच नोंदविले आणि मतपत्रिका लिफाफ्यामध्ये टाकून अधिका-यांकडे सुपूर्द केली.
यासेाबतच सदर टीमने राज्याच्या सीमेवरील नारपठार (विजयगुडा) येथील जमुनाबाई दुर्गे आत्राम (वय 90), संग्राम किसन कोरपल्लीवार (वय 89) आणि मुद्रीकाबाई संग्राम कोरपल्लीवार (85) या वयोवृध्द नागरिकांचेही गृह मतदानाद्वारे मत नोंदविले. या टीममध्ये मतदान अधिकारी नंदकिशोर उपासणी, नागेश उरकुडे, सुक्ष्म निरीक्षक (मायक्रो ऑब्जर्झव्हर) शिवशंकर उपरे, क्षेत्रीय अधिकारी संदीप लंगडे, विलास वानखेडे, पोलिस अंमलदार कौमुद मडावी आणि छायाचित्रकार प्रफुल गिरसावडे उपस्थित होते.
मतदानाची गोपनीयता : गृह मतदान करतांना मतदान प्रक्रियेची गोपनीयता पाळण्याच्या सूचना भारत निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार फॉर्म 13 - ए (डिक्लरेशन), फॉर्म 13 - बी (कव्हर ए लिफाफा), फॉर्म 13 - सी (कव्हर बी लिफाफा) आणि फॉर्म 13 - डी (मतदान कसे करायचे याबाबत सुचना) आदी प्रक्रियेबाबत अधिकारी व कर्मचा-यांनी सुरवातीला मतदारांना माहिती दिली. यावेळी घरामध्ये स्थापन केलेल्या मतदान कक्षामध्ये सदर मतदारांनी आपले मत नोंदविले. यावेळी मतदान करतांना कोणताही दुसरा व्यक्ती त्यांच्याजवळपास नव्हता. मतपत्रिका घडी केल्यानंतर सदर मतपत्रिका छोट्या लिफाफामध्ये आणि नंतर मोठ्या लिफाफामध्ये टाकून मतपेटीत जमा करण्यात आली.