मूल : मूल शहरात जादूटोण्याच्या संशयावरून जमावाने घरावर हल्ला केल्याची खळबळजनक घटना बुधवारी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीतून उघडकीस आली. (witchcraft)
मूल शहरातील वॉर्ड नं. १२ मध्ये २६ ऑगस्ट २०१३ रोजी सुनीता राधेश्याम गुज्जनवार आणि कुटुंबातील सदस्य रात्री ८:३० वाजता दरम्यान जेवण करीत होते. दरम्यान, वार्डातील सुमारे ३० ते ३५ जणांच्या जमावाने जादूटोण्याच्या संशयावरून अश्लील शिवीगाळ करीत घरावर हल्ला केला. मात्र मुलीने मोठ्या धाडसाने प्रतिकार केल्यामुळे जमावाने माघार घेतली, असे पीडितांचे म्हणणे आहे.
यासंदर्भात सुनीता गुज्जनवार यांनी मूल पोलिस ठाण्यात त्याच दिवशी तक्रार दाखल केली. मात्र, अदखलपात्र गुन्हा नोंदवून आरोपींना अभय देण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोपही सुनीता गुज्जनवार यांनी केला. आरोपींवर काहीच कारवाई न झाल्यानेबुधवारी उपविभागीय पोलिसअधिकाऱ्यांकडे तक्रार देऊनकारवाईची मागणी केली.
गुज्जनवार कुटुंबीय दहशतीत
जादूटोण्याच्या संशयावरून जमाव घरावर चालून आल्याने गुज्जनवार कुटुंब प्रचंड दहशतीत आहे.
पोलिसांनी अद्याप कुणावरही गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे आरोपींची पुन्हा हिंमत वाढू शकते. त्यातून आमच्या कुटुंबाला धोका आहे, अशी भीती गुज्जनवार कुटुंबीयांनी वर्तवली.
सप्टेंबरपासून गांधी चौकात उपोषण
पोलिसांनी आरोपी सतीश आकुलवार व इतर व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा १८ सप्टेंबरपासून गांधी चौक मूल येथे आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा सुनीता गुज्जनवार यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रति पोलिस महासंचालक, पोलिस अधीक्षक, पोलिस उपविभागीय अधिकारी मूल व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सिंदेवाही येथील संघटकांनाही पाठविली आहे.
जादूटोण्याच्या संशयावरुन घडलेल्या प्रकाराबाबत तक्रारदार व संबंधित व्यक्ती अशा दोनही बाजूंतील लोकांना ठाण्यात बोलावले. दोघांतही समेट घडवून आणण्यात आला.-सुमित परतेकी, ठाणेदार