चंद्रपूर:- समाजाने आखून दिलेली लक्ष्मणरेषा पार केल्याने काय परिणाम भोगावे लागतात, हे एका प्रकारामुळे आज याचे चित्र समाजापुढे आले आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात एका 13 वर्षीय मुलीला सहा महिन्यांची गर्भवती (13 year girl pregnant) व्हावे लागले. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे.
चिमूर तालुक्यातील एका गावात सातव्या वर्गात शिकणारी एक १३ वर्षीय मुलगी सहा महिन्यांची गर्भवती आहे, तर तिला गर्भवती करणारा मुलगाही 15 वर्षीय अल्पवयीन आहे. दोघांचे घर जवळच असल्याने या दोघांमध्ये अल्पवयीन वयात प्रेमसंबंध निर्माण झाले. यातूनच त्यांच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले. यातून 13 वर्षीय मुलगी गर्भवती झाली. याची पुसटशी कल्पनाही त्या मुलीला आली नाही. परंतु सहाव्या महिन्यात तिचे पोट दुखत असल्याने आईने तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. त्यावेळी ती गर्भवती असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली. ज्या वयात आईची ममता कळत नाही त्या वयात ती आता आई बनणार आहे.
याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आली असून, मुलाला बालसुधारगृहात पाठविले आहे, तर मुलीला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.