अमर रहे, अमर रहे चंद्रशेखर भोंडे अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर अंत्ययात्रेत सहभाग घेतला. खात रोड- खांब तलाव चौक-शास्त्री चौक-गांधी चौक-त्रिमूर्ती चौक या मार्गे मोक्षधामाकडे अंत्ययात्रा आली. आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधिक्षक वसंत जाधव, कर्नल श्री. मनकोटिया, मेजर श्री. त्रिपाठी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी महेश पाटील, यांच्यासह स्वातंत्र्य संग्राम सैनिक संघटनांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. जिल्हा पोलीस दलाने बंदुकीच्या ३ फैरी झाडून मानवंदना दिली. सैन्यदला तर्फे सुद्धा मानवंदना देण्यात आली. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे सुधीर लुटे, श्री. घनमारे यांच्यासह उपस्थित जनसमूदायाने सामूहिक श्रध्दांजली अर्पण केली. शहीद चंद्रशेखर भोंडे यांचे लहान बंधू सचिन भोंडे यांच्या हस्ते अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.