आरमोरी येथे वृद्ध दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला पतीचा मृत्यु, पत्नी गंभीर जखमी |
आरमोरी : अज्ञात व्यक्तीने वृद्ध दाम्पत्यावर धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून खून केल्याची घटना आरमोरी येथील तहसील कार्यालयासमोरील वस्तीत सोमवारच्या रात्री 2 वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचा मृत्यु झाला असून त्यांची पत्नी गंभीर जखमी आहे. आरमोरी येथील रहिवासी असलेले गौतम ऋषी निमगडे वय 63 वर्षे यांचा मृत्यु झाला तर त्यांची पत्नी माया गौतम निमगडे वय 60 वर्षे गंभीर जखमी आहेत. घटनेची तक्रार आरमोरी पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे.
हे नक्कीच वाचा: मुल: ग्रामपंचायतीत लाखोचा भ्रष्टाचार; माजी सरपंच व सचिवांनी लावला निधीला चुना
सविस्तर वृत्त असे की, मृतक गौतम निमगडे व त्यांची पत्नी माया निमगडे आपल्या राहत्या घरी झोपेत असताना रात्री 2 ते 3 वाजताच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने दरवाज्याची घंटी वाजविली. एवढ्या रात्री कोण आलेत हे बघण्यासाठी गौतम निमगडे यांनी दरवाजा उघडला असता क्षणाचाही विलंब न लावता हातात असलेल्या शस्त्राने त्यांच्या वृद्ध दाम्पत्याच्या डोक्यावर सपासप वार करून अज्ञात हल्लेखोर पळून गेला. जखमी अवस्थेत असलेल्या दाम्पत्यांनी हल्ला झाल्याची माहिती तळमजल्यावर राहत असलेल्या मुलाला भ्रमणध्वनीद्वारे दिली. मुलाने आरडा ओरड करीत आईवडिलांना आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता भरती केले. उपचारादरम्यान गौतम निमगडे यांचा मृत्यु झाला. गंभीर जखमी असलेल्या माया गौतम निमागडे यांना ब्रम्हपुरी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
सदर घटनेची तक्रार आरमोरी पोलिस ठाण्यात झाली असून, अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस विभागांनी स्वान पथक पाचारण केले असून, घटना स्थळाचा पंचनामा करून फिंगर प्रिंट घेण्यात आले. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी प्राणिल गिल्डा यांनी भेट दिली. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक पंकज बोडसे करीत आहेत. मृतक हे शांत व मनमिळावू स्वभावाचे आहेत. त्यामुळे पोलिसांनी घटनेची कसून चौकशी करून अज्ञात आरोपीला तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी आरमोरी शहरवासियांनी केली आहे