यंग चांदा ब्रिगेड संघटनेने भ्रष्टाचाराविरोधात केले "दे धक्का आंदोलन" |
Chandrapur News: चंद्रपूर महानगरपालिकेत गेली पाच वर्षे भाजपची सत्ता आहे. मात्र महापालिका भ्रष्टाचार व गैरव्यवहाराचे केंद्र झाल्याचा आरोप स्थानिक अपक्ष आमदारांनी केला आहे. चंद्रपूर महापालिकेतील गैरकारभाराचा निषेध करण्यासाठी आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या यंग चांदा ब्रिगेड संघटनेने "दे धक्का" आंदोलन केले.
महापालिकेत कचरा निविदा घोटाळा- अमृत पाणी घोटाळा - कोरूना काळातील गैरव्यवहार आदी घोटाळा झाल्याचा आरोप आमदार जोरगेवार यांनी केला. महापौरांनी नागरिकांना सुविधा पुरविण्याऐवजी स्वतःच्या वाहनाला व्हीआयपी नंबर मिळावा यासाठी 70 हजार रु. खर्च केल्याचा आरोप केला जात आहे.
भाजपने गेल्या काही वर्षात चंद्रपूरकरांना लुटल्याचा आरोप करत चंद्रपूरची जनता भाजपला माफ करणार नाही असे विधान त्यांनी केले. एकीकडे चंद्रपुरात आ. जोरगेवार यांनी सत्ताधारी भाजप महापालिके विरोधात आंदोलन केले तर या आंदोलनाचा सुगावा लागल्याने भाजपने काही तास आधीच आमदार जोरगेवार यांच्या विरोधात आंदोलन केले. चंद्रपूरकराना 200 युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन आमदारांनी दिले होते. त्याचे काय झाले? असा सवाल भाजपने आंदोलनातून विचारला. या दोन्ही आंदोलनांमुळे चंद्रपुरचा गांधी चौक तणावाचे केंद्र बनला होता.