राजुरा : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरातील बिरसा मुंडा नगर परिसरात दहावीत शिक्षण घेणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत विद्यार्थिनीचे नाव ऋतुजा सचिन कुकडे (वय १६) असे आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना शनिवारी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. त्या वेळी तिचा आठ वर्षांचा लहान भाऊ घरात उपस्थित होता.
ऋतुजाचे आई-वडील शासकीय सेवेत कार्यरत असून, आई पोलीस विभागात तर वडील तलाठी म्हणून कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे. कुकडे कुटुंब मूळचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील असून सध्या राजुरा येथे वास्तव्यास आहे.
अभ्यासात हुशार आणि शांत स्वभावाची म्हणून ओळख असलेल्या ऋतुजाने हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह पुढील वैद्यकीय प्रक्रियेसाठी पाठविण्यात आला असून, या घटनेचा तपास राजुरा पोलीस करत आहेत. आत्महत्येमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध अंगांनी चौकशी सुरू आहे.



कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.