चंद्रपूर: जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन सतर्क झाले आहे. नागपूर प्रादेशिक हवामान केंद्र आणि भारतीय हवामान विभागाने २९ जुलैसाठी जिल्ह्यात रेड अलर्ट, तर ३० जुलैसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर परिणाम होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी २९ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व-प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये तसेच खासगी कोचिंग क्लासेसना सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पाऊस किंवा वादळी वारे सुरू असताना शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. पाणी साचलेले रस्ते, अंडरपास आणि सखल भागातून प्रवास करू नये. दृश्यमानता कमी असल्यास वाहनांचा वेग नियंत्रित ठेवावा किंवा सुरक्षित ठिकाणी थांबावे. तसेच वीजवाहिन्या आणि विद्युत खांबांपासून सुरक्षित अंतर राखावे.
विजांचा कडकडाट सुरू असताना मोकळ्या जागेत थांबणे धोकादायक ठरू शकते. अशा वेळी शक्य तितक्या लवकर पक्क्या इमारतीत आश्रय घ्यावा. बाल्कनी, छत किंवा उघड्या जागी उभे राहणे टाळावे. शेतात किंवा मोकळ्या परिसरात अडकल्यास सखल ठिकाणी बसून स्वतःचे संरक्षण करावे. उंच झाडे, धातूचे मनोरे आणि तारांच्या कुंपणांपासून दूर राहणे आवश्यक आहे.
घरात असताना विजेची उपकरणे बंद ठेवावीत. विजांच्या कडकडाटादरम्यान लँडलाईन फोनचा वापर, शॉवरखाली अंघोळ करणे किंवा पाण्याच्या नळांना स्पर्श करणे टाळावे. तसेच उघड्या दार-खिडक्यांजवळ उभे राहू नये. धातूच्या संरचनेच्या शेड किंवा तंबूंमध्ये आश्रय घेणेही सुरक्षित नाही.
नदी, नाले किंवा पुलांवरून पाणी वाहत असल्यास ते ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करावे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी ०७१७२-२५००७७ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.




कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.