सिंदेवाही : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांवर निसर्गाने मोठ एक संकट ओढवले आहे. पेरणीच्या हंगामात शेतात काम करत असताना आकाश ढग होऊन अचानक पाऊसणे सुरवात केली त्यात एका महिला शेतकऱ्यावर अचानक वीज कोसळल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून त्यांच्यावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राज्यात अनेक भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पेरणीची योग्य वेळ हातातून जाऊ नये म्हणून अनेक शेतकरी पावसाची संधी साधून शेतातील कामे वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच परिस्थितीत सिंदेवाही तालुक्यातील कळमगाव (गन्ना) येथे रविवारी (२८ जून) सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कळमगाव येथील रहिवासी सुरेखा देविदास पाकमोळे या आपल्या शेतात तुरीची लागवड करण्याचे काम करत होत्या. त्यांच्या सोबत आणखी एक महिला देखील शेतात काम करत होती. दुपारनंतर वातावरणात अचानक बदल झाला आणि आकाशात ढग दाटून विजांचा कडकडाट सुरू झाला. काही क्षणांतच जोरदार कडकडाटासह वीज थेट सुरेखा पाकमोळे यांच्या अंगावर कोसळली.
वीज कोसळताच त्या गंभीर जखमी होऊन शेतातच कोसळल्या. हा प्रकार पाहून त्यांच्या सोबत असलेल्या महिलेने मोठ्याने आरडाओरडा करून मदतीसाठी हाक मारली. आवाज ऐकून परिसरातील इतर शेतकरी आणि ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी धावले. त्यांनी जखमी अवस्थेतील सुरेखा पाकमोळे यांना त्वरित शेताबाहेर काढून उपचारासाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे अधिक उपचारासाठी त्यांना तातडीने चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
Read Also: समृद्धी महामार्गावर काळाचा घाला; चंद्रपूरच्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
या घटनेमुळे पावसाळ्यात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हवामानात अचानक बदल होत असल्याने वीजांच्या कडकडाटादरम्यान मोकळ्या शेतात काम करणे धोकादायक ठरू शकते, असे तज्ज्ञांकडून वारंवार सांगितले जाते. तरीही शेतीची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या धडपडीत अनेक शेतकरी जीव धोक्यात घालून काम करत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने नागरिकांना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच शेतातील कामे करण्याचे आवाहन केले आहे. विजांचा कडकडाट सुरू झाल्यास तातडीने सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा आणि उघड्या मैदानात किंवा शेतात थांबणे टाळावे, असेही प्रशासनाने सांगितले आहे.




कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.