चंद्रपूर : समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात चंद्रपूरमधील एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नव्या शासकीय नोकरीच्या निमित्ताने आनंदाने प्रवासाला निघालेल्या या कुटुंबावर काळाने घाला घातल्याने संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात समृद्धी महामार्गावरील चॅनेज क्रमांक १०६ जवळ घडला. चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरात राहणारे जीवने कुटुंब चारचाकी वाहनाने अकोल्याकडे जात होते. कुटुंबातील आरती जीवने यांची शासकीय सेवेत नियुक्ती झाल्याने त्या रुजू होण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांच्यासोबत पती, मुलगी आणि कुटुंबातील इतर सदस्यही प्रवास करत होते.
प्रवासादरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या त्यांच्या वॅगनआर कारची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला मागून जोरदार धडक बसली. धडक इतकी तीव्र होती की कारचा पुढील भाग कंटेनरच्या मागील बाजूस घुसला आणि वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की वाहनातील सर्व प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या दुर्घटनेत महादेव जिवाजी जीवने, लताबाई महादेव जीवने, भास्कर महादेव जीवने, आरती भास्कर जीवने आणि त्रिशा भास्कर जीवने यांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे एका कुटुंबातील तीन पिढ्या एका क्षणात काळाच्या पडद्याआड गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, स्थानिक पोलीस आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अपघातग्रस्त कार पूर्णपणे चिरडली गेल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला मोठी मेहनत घ्यावी लागली. त्यानंतर सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
या भीषण अपघातामुळे जीवने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून चंद्रपूर शहरात शोककळा पसरली आहे. काही तासांपूर्वी नव्या आयुष्याच्या आशेने घराबाहेर पडलेले कुटुंब एका भीषण अपघातात कायमचे हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अपघाताचे नेमके कारण काय होते, वाहनाचा वेग, चालकाचे नियंत्रण सुटणे किंवा इतर कोणते कारण याबाबत पोलीस तपास करत असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.




कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.