चंद्रपूर: जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली असून, जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या ६० वर्षीय महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मृत महिलेचे नाव इंदिराबाई शंकर उईके (वय ६०) असे असून त्या नागभीड तालुक्यातील किटाळी मेंढा गावातील रहिवासी होत्या. सध्या परिसरात तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू असल्यामुळे गावातील अनेक नागरिकांप्रमाणे इंदिराबाईही आज सकाळी जंगलात गेल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, जंगल परिसरात अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवला. हा हल्ला अत्यंत भीषण असल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली.
या घटनेमुळे जंगलालगतच्या गावांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली असून, वाघाचा बंदोबस्त करावा तसेच जंगलात जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष पथके तैनात करावीत, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. तसेच मृत महिलेच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणीही जोर धरत आहे.



कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.