गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी मार्गावर सी-६० पथकाच्या बुलेटप्रूफ वाहनाला एका भरधाव टिप्परने धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने पथकातील सर्व जवान सुरक्षित राहिल्याने मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली-आरमोरी मार्गावर सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी गिट्टी खाली करून एक रिकामी टिप्पर पाचगावकडे परतत होता. त्याच वेळी अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात टिप्पर चालकाने वाहन उजव्या बाजूला वळवले.
मात्र याच क्षणी समोरून सी-६० पथकाचे बुलेटप्रूफ वाहन येत होते. वेगात असलेल्या टिप्परची त्या वाहनाला जोरदार धडक बसली. धडकेचा जोर इतका होता की बुलेटप्रूफ वाहनाचा मागील टायर फुटला. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून ते रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात उतरले.
सुदैवाने वाहन बुलेटप्रूफ असल्यामुळे तसेच चालकाने प्रसंगावधान राखल्याने वाहनातील कोणत्याही जवानाला गंभीर दुखापत झाली नाही. सर्व जवान सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
