मुल :- मुल तालुक्यातील मोजा बेलघाटा येथील रहिवासी पितांबर गुलाब सोयाम (वय ३७) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास ते आपल्या गुरांना चारण्यासाठी जंगल परिसरात गेले होते. रोजच्या प्रमाणे सायंकाळपर्यंत ते घरी परततील अशी अपेक्षा कुटुंबीयांना होती, मात्र उशीर झाला तरी ते न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.
रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेतल्यानंतरही कोणताही ठावठिकाणा न लागल्याने कुटुंबीयांनी गावकऱ्यांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली आणि याबाबत वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागानेही शोधासाठी तयारी सुरू केली.
रविवारी सकाळी गावकरी आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे जंगलात शोधमोहीम राबवली. या दरम्यान कन्हाळगाव बिट अंतर्गत कक्ष क्रमांक १७६५ या भागात पितांबर सोयाम यांचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, मुल येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या घटनेमुळे बेलघाटा परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.




कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.