सिंदेवाही :- सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही गावात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात शनिवारी ही हृदयद्रावक घटना घडली. गुंजेवाही येथील रहिवासी छाया अरुण राऊत (वय ४९) या सकाळच्या सुमारास आपल्या शेतात धान आणि तुरीच्या पिकांची पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र सायंकाळपर्यंत त्या घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.
यानंतर कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी एकत्रितपणे त्यांचा शोध सुरू केला. सायंकाळी साडेसातच्या सुमारास शेतालगत असलेल्या एका नाल्याजवळ छाया राऊत यांचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक पाहणीत वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहाची अवस्था अत्यंत विदारक असल्याने हल्ल्याची तीव्रता लक्षात आली.
घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि सिंदेवाही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. रविवारी शवविच्छेदन करण्यात आले असून, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.




कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.