चंद्रपूर :- माणुसकीला काळिमा फासणारी आणि समाजमन हादरवून सोडणारी एक गंभीर घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एका शेतकऱ्याला अखेर कर्जफेडीसाठी स्वतःची किडनी विकण्यास भाग पाडले गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर गावातील आहे. रोशन सदाशिव कुडे असे या पीडित शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्या आयुष्यातील संघर्षाची कहाणी अत्यंत वेदनादायी आहे. केवळ चार एकर शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या रोशन कुडे यांना निसर्गाच्या प्रतिकूलतेचा मोठा फटका बसला. शेतीतून अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक अडचणी वाढत गेल्या.
कुटुंबाला आधार मिळावा या हेतूने त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी दोन खासगी सावकारांकडून प्रत्येकी ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले. मात्र, दुर्दैवाने खरेदी केलेल्या गायींचा मृत्यू झाला आणि शेतीतूनही उत्पन्न झाले नाही. यामुळे त्यांच्या अडचणी अधिकच वाढल्या.
याच टप्प्यावर त्यांच्या आयुष्यात संकटांची साखळी सुरू झाली. सावकारी कर्जावरील व्याजाचा बोजा वाढत गेला. कर्ज वसुलीसाठी सावकारांकडून मानसिक त्रास दिला जाऊ लागला. कर्जातून मुक्त होण्यासाठी रोशन कुडे यांनी दोन एकर जमीन विकली, ट्रॅक्टर विकला, घरातील साहित्य विकले; मात्र तरीही कर्ज फिटले नाही.
धक्कादायक बाब म्हणजे, सुरुवातीला घेतलेले अवघे एक लाख रुपयांचे कर्ज सावकारांच्या अमानुष आणि बेकायदेशीर व्याजामुळे तब्बल ७४ लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. एका लाख रुपयांवर दिवसाला १० हजार रुपये व्याज आकारले जात असल्याचा आरोप आहे.
या अन्यायकारक वसुलीला कंटाळून आणि कर्जातून सुटका मिळवण्याच्या आशेने या शेतकऱ्याने अत्यंत टोकाचा निर्णय घेतला. रोशन कुडे यांनी आपली किडनी विकण्याचा वेदनादायी मार्ग स्वीकारला. ही घटना केवळ एका शेतकऱ्याची शोकांतिका नसून, राज्यातील सावकारी व्यवस्थेच्या क्रूर वास्तवाचे भयावह चित्र आहे.
या घटनेमुळे कर्जबाजारीपणाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. कायदा, प्रशासन आणि व्यवस्थेची जबाबदारी नेमकी कुठे आहे, असा गंभीर सवाल या घटनेने उपस्थित केला आहे.




कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.