गडचिरोली :- जिल्ह्यातील आरोग्य विभागात धक्कादायक घटना घडली आहे. मुलचेरा तालुक्यातील उपकेंद्रात कार्यरत असलेल्या ४५ वर्षीय कंत्राटी आरोग्य सेविकेने ६ डिसेंबर रोजी मानसिक छळाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
पीडितेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अधिकाऱ्याने गेल्या दोन वर्षांपासून तिची वेतनवाढ रोखून ठेवली होती तसेच सतत दबाव टाकून अशोभनीय मागण्या करून तिला त्रास दिला जात होता. घटना घडण्याच्या दिवशी आरोग्य सेविकेने नियमितपणे आपले काम केले आणि संध्याकाळी घरी परतली. त्या वेळी ती चिंताग्रस्त दिसत होती. पतीने दोघांसाठी जेवण तयार केले, ते दोघे जेवलेही. त्यानंतर पतीला झोप लागताच तिने विषारी द्रव सेवन केले.
ही बाब लक्षात येताच पतीने तिला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आणि नंतर पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेनंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी ७ डिसेंबर रोजी रुग्णालयात भेट देऊन पीडितेच्या पतीशी सविस्तर चर्चा केली. पतीने संबंधित अधिकाऱ्यासोबतचे चॅट्सही उपलब्ध करून दिले असून संपूर्ण अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सुहास गाडे यांनी सांगितले होते.
Read Also: वेतनामध्ये वाढीचे आमिष दाखवून लैंगिक सुखाची मागणी; महिला आरोग्य सेविकेचा आत्महत्येचा प्रयत्न
या घडामोडीनंतर महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने कारवाई करत गडचिरोली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद घनश्याम म्हशाखेत्री यांना तात्काळ निलंबित केले आहे. प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्याने आणि विभागीय चौकशीची प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील तरतुदीनुसार ही कार्यवाही करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
निलंबन काळात डॉ. म्हशाखेत्री यांचे मुख्यालय जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, गोंदिया येथे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी दिली.




कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.