![]() |
| भीषण अपघातात बापलेकासह तिघांचा मृत्यू |
मूल, चंद्रपूर :- जिल्ह्यातील मूल शहरापासून काही अंतरावर असलेल्या बल्की देव वळणावर आज, बुधवार (८ ऑक्टोबर) दुपारी सुमारे १ वाजता दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृतांमध्ये यश देविदास शेंडे (२२) आणि त्यांचे वडील देविदास शेंडे (४५), रा. मारोडा, ता. मूल, जि. चंद्रपूर यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या दुचाकीवरील वासुदेव सहारे, रा. भादुर्णा यांचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.
अपघात इतका भीषण होता की, दोन्ही दुचाक्या पूर्णपणे चक्काचूर झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार, यश आणि त्यांचे वडील शेती संदर्भातील ऑनलाईन कामानिमित्त मूल येथे आले होते. काम आटोपल्यानंतर दोघेही बापलेक त्यांच्या दुचाकीने गावाकडे परत जात असताना, समोरून येणाऱ्या वासुदेव सहारे यांच्या दुचाकीशी बल्की देव वळणावर जबर धडक झाली. धडक बसताच तिघेही रस्त्यावर कोसळले.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने जखमींना मदत केली आणि वासुदेव सहारे यांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्यांनीही अखेरचा श्वास घेतला. घटनेची माहिती मिळताच मूल पोलिस ठाण्याचे ठाणेदार विजय राठोड आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेहांना शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
या हृदयद्रावक अपघाताने परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.




कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.