सातारा : कराड तालुक्यातील ओगलेवाडी परिसरात दोन युवकांचे अपहरण करून त्यांना शिराळा तालुक्यात नेऊन मारहाण केल्याची घटना घडली आहे. प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून संशयितांनी ही कारवाई केल्याचे समोर आले आहे. तसेच, मारहाणीनंतर पोलिसांत दाद मागितल्यास जीव गमवावा लागेल, अशी धमकीही पीडितांना देण्यात आली.
या प्रकरणात आदिनाथ गुरव (रा. हजारमाची, ता. कराड) यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात अनिकेत माळी, अविनाश माळी, अजिंक्य माळी आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
घटनाक्रम असा की, १३ सप्टेंबरच्या सायंकाळी साडेसातच्या सुमारास सनी सूर्यवंशी यांनी गुरव यांना संदेश ताटे याला करवडी फाटा येथे आणण्यास सांगितले. गुरव ताटे यांच्यासोबत ठिकाणी पोहोचल्यावर अचानक एक चारचाकी वाहनातून काही संशयित उतरले. त्यांनी ताटे याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली.
गुरव यांनी ताटे याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता, संशयितांनी त्यांनाही मारहाण करून जबरदस्तीने दोघांना वाहनात बसवले व शिराळा तालुक्यातील खेड परिसरात नेले. तेथे लाकडी दांडके, लाथाबुक्क्या आणि चाकूच्या मुठीने दोघांना मारहाण करण्यात आली. अखेरीस कराडजवळील कोल्हापूर नाक्यावर दोघांना सोडून देत, पोलिसांत तक्रार केल्यास जीव घेऊ, अशी धमकी आरोपींनी दिली.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.